औरंगाबाद - रस्त्यालगत, हरित पट्ट्यात वाहतुकीला अडथळा ठरत असलेली भंगारात निघालेली वाहने उचलण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. मनपा, पोलिस आणि आरटीओच्या सहकाऱ्याने ही मोहिम राबवत आहे. मनपा शहर अभियंता सखाराम पानझडे या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारवाई
उच्च न्यायालयाच्या आदेशाने गृहविभागाने
वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी रस्त्यालगत असलेली भंगार वाहने ताब्यात घेण्याची
मोहीम राबविण्याचे पत्रक काढले होते. यासाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार
पडलेल्या बैठकीत ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी मनपा
आयुक्त डॉ. निपूण विनायक, प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते उपस्थिती
होते. त्यानुसार आज शनिवारपासून या मोहिमेला प्रारंभ झाला. सकाळपासूनच रस्त्यालगत
असलेली वाहने उचलण्यास सुरुवात झाली. ताब्यात घेतलेली वाहने गरवारे स्टेडियम येथे
उभी करण्यात येत आहे. शनिवार दुपारपर्यंत शहरातील विविध ठिकाणाहून १४ कार, २ अवजड वाहने,
३ दुचाकी अशी १७ वाहने गरवारे
स्टेडियमच्या पार्किंगमध्ये जमा करण्यात आली आहे.
शहरातील नऊ प्रभागात ९ पथके तयार करण्यात आली असून, संबंधित वॉर्डाचा इंजिनिअर पथक प्रमुख आहे. प्रत्येक पथकाला दोन पोलिस कर्मचारी, ३ पथकांमागे एक पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी, ६५ ते ७० कर्मचारी या मोहिमेमध्ये कार्यरत आहेत. शहरातील भंगार वाहने उचलण्यासाठी १८ क्रेन, २० ट्रकचा वापर करण्यात येत आहे. १ ते ३ डिसेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. मोहिमेला आलेल्या खर्चानंतर दंडाची रक्कम ठरवण्यात येईल, असे सखाराम पानझडे यांनी सांजवार्ताला सांगितले.










